‘देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवार साहेब म्हटल्यावर 10 सेकंदात गाढ झोप येईल’

टीम महाराष्ट्र देशा- ‘देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवार साहेब म्हटल्यावर 10 सेकंदात गाढ झोप येईल’, अशी बोचरी टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील मुनगंटीवारांनी निशाणा साधला आहे. ते वर्ध्यातील आर्वी येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार ?
“खाटेवर पडल्या पडल्या कधी विचार करा…डोळे बंद करा…देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकेल…शरद पवार साहेब खरंच पंतप्रधान होऊ शकतील?.. नरेंद्र मोदी म्हटल्यावर नव चैतन्य जागृत होईल. शरद पवार म्हटल्यावर 10 सेकंदात गाढ झोप येईल…राहुल गांधी म्हटलं तर तुम्हाला कसं तरीच वाटेल आणि आपण झोपू शकू, की नाही असा प्रश्न पडेल”.

दरम्यान,आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची भेट घेतली. याच दरम्यान नायडू यांची दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांची भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी भाजप विरोधात इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.