‘भाजप-शिवसेना युती’ चर्चेची जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांवर ?

मुंबई: भाजपकडून शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चेची सूत्र देल्याचे वृत्त आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. ‘केंद्रातली एनडीएची आघाडी राज्यात टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षाला सोडून निवडणुका लढवण्याची आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही. युतीसाठी चर्चेला कोण जाणार हे कोअर कमिटीच्या बैठकीत ठरेल.’ असे स्पष्ट केले.

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सत्तेत असूनही शेवसेनेची भूमिका भाजपविरोधी राहिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ शिवसेना आणि भाजप एकत्रच आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी एकत्रच आहोत आणि एकत्रच लढू’अशी प्रतिक्रिया दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी अगोदरच युती तोडलेली आहे, असे स्पष्ट केले.

‘तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी परिस्थिती सध्या भाजप आणि शिवसेनेची झाली आहे. अर्थसंकल्पावरील उत्तरातील भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना- भाजप एकत्र असून पुढील निवडणूक एकत्रच लढवतील, असे म्हटले होते. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनीही युतीचे संकेत दिले. शुक्रवारी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नव्हे, तर वायएसआर आणि टीडीपी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडताना शिवसेनेने मात्र या प्रस्तावाच्या वेळेस तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ‘शिवसेना आणि भाजप एकत्रच आहेत आणि एकत्रच राहतील यात शंका नाही. राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी एकत्रच असून पुढेही एकत्रच लढू,’ असे स्पष्ट केले होते.