पोहरादेवीत तुफान गर्दी, संजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली

sanjay rathod

यवतमाळ : परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत. इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले संजय राठोड आज (23 फेब्रुवारी) पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत.

संजय राठोड सहपरिवार पोहरादेवीत येतील. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी शिवसेना पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत होता. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवला आहे.

यावरूनच आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आव्हान प्रदर्शन आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या