fbpx

‘काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास, कित्येकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील’

मुंबई – एक्झिट पोलमध्ये मागे पडल्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी आशादायी असलेले विरोधी पक्ष आता इव्हीएम तसेच एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थितीत करत आहेत.तर दुसऱ्या बाजूला विजयाचा सुगंध आता भाजप नेत्यांना येवू लागल्याने आत्मविश्वास वाढल्याचे पहायला मिळत आहे.यातूनच आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अजब दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट केल्यास कित्येक कार्यकर्तेही भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वसंत स्मृत्ती या भाजप कार्यालयात ते बोलत होते. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते विजय सिंह मोहिते पाटील यांच्यानंतर कोण? अशी विचारणा पत्रकारांनी करताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बोंबाबोंब करणाऱ्या विरोधकांचा देखील समाचार घेतला. विरोधकांना आता बोलायला काहीच शिल्लक नसल्याने ते ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विरोधी पक्षात असलेले कार्यकर्तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. लोकसभेत भाजपला घवघवीत यश मिळणारच आहे. पण आणखी अभ्यास करून भाजपचा पदाधिकारी मैदानात उतरून विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.