fbpx

या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेसह इतर मित्रपक्षांचे ही समाधान होणार : सुधीर मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना आधी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच शिवसेना आणि इतर घटक पक्षांना अपेक्षित असाच निर्णय घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, असे संकेत यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात ६ जूनला दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शहांसोबत चर्चाही केली होती. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार तसेच मित्रपक्षांना या मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आज राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपुत्र अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक सुरू होती. या बैठकीला मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होते. या बैठकीत विखे पाटलांच्या भाजपप्रवेश आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.