fbpx

‘सुधाकर शृंगारे १ लाख मतांनी निवडून येतील’

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे ७५ हजार ते १ लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा अंदाज येथील राज्यशास्ञाचे अभ्यासक तथा राजकीय विश्लेषक डाँ.व्ही.एल.एरंडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी २३ मे रोजी असल्याने मतदारसंघातील जनतेला लातूरचा ‘बाजीगार’ कोण ठरणार याबाबत कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने डाँ.एरंडे यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.लातूर मतदारसंघातून कोण निवडून येईल हे सांगता येत नसल्याने एकुणच मतदारसंघात गोंधळलेली स्थिती निर्माण झाली असून उमेवारांमध्ये मोठी धाकधूक आहे. भाजपाचे पदाधिकारी म्हणतात आमचा उमेदवार निवडून येणार तर काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी आमचाच उमेदवार निवडून येणार असा दावा ठोकतात.

परंतु खासगीत माञ भाजप व काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी यावेळेस नेमकं कोण विजयश्री खेचून आणणार हे सांगणे अवघड असल्याचे मान्य करतात. त्यामुळे सामान्य जनतेतून कोण निवडून येईल हे कोणाकडूनही छातीठोकपणे सांगितले जात नसल्यामुळे लातूरचा खासदार कोण होणार यावरुन मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान डाँ.एरंडे माञ लातूरमधून भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येणार असा दावा करत आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील ८ मतदारसंघाचे त्यांनी विश्लेषण केले आहे.

मराठवाड्यातून भाजपला ३, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर काँग्रेसला केवळ एकमेव जागा मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे, जालना येथे रावसाहेब दानवे, बीड येथे प्रितम मुंडे, हिंगोली येथे हेमंत पाटील, परभणी येथे राजेश विटेकर, उस्मानाबाद येथे राणा जगजितसिंह पाटील, लातूर येथे सुधाकर शृंगारे तर नांदेड येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण विजयी होतील असा दावा डाँ.एरंडे यांनी केला आहे.