आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांकडून परभणीत वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा

cm

औरंगाबाद : परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र, अनेक वेळा आंदोलने करुन देखील परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाले नाही. परभणीची मागणी असून देखील उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्याने परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्याच सरकार विरोधात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला यश आले असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनामित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घाेषणा केली आहे.

परभणीकरांच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या पुढाकारातून जोरदार आंदोलन करण्यात आले. स्वाक्षरी माेहिम राबवल्यानंतर सलग चार दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. त्या नंतर उपोषणाला बसण्याचा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला होता. मात्र, उपोषणाचा निर्णय नंतर मागे घेण्यात आला. मात्र, आता ही मागणी मान्य झाली असल्याने या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी परभणीकरांची इच्छा होती. त्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. भाजपच्या वतीने मात्र, हे दिखाव्याचे आंदोलन असल्याची टीका केली होती. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी होत या मागणीला पाठिंबा दर्शवली होता.

महत्त्वाच्या बातम्या