निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश; के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नाही- राजनाथ सिंह

sharad pawar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. के.के.रेंज संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, खा.शरद पवार आ.निलेश लंके, संरक्षण विभागाचे सचिव, अधिकारी यांची मीटिंग संरक्षण मंत्रालय दिल्ली येथे आज पार पडली. त्यानंतर के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याचे आश्‍वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले असल्याचा दावा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे.

या बैठकीमध्ये खा.शरद पवार यांनी भूसंपादन करण्यास विरोध केला. भूसंपादन झाल्यास या भागातील शेतकरी विस्थापित होतील. अगोदरच मुळा धरण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे विस्थापन झाले आहे. मुळा धरण असल्यामुळे हा भाग बागायती आहे. येथील प्रमुख पीक डाळिंब, ऊस असून त्यामुळे स्थलांतर शक्य नाही. असे खा.पवार यांनी संरक्षण मंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. तसेच गेल्या चार दिवसांपासून या महत्वाच्या प्रश्नावर तुमची भेट घेण्यासाठी आमचे आमदार निलेश लंके हे दिल्लीत थांबून होते हे ही खा.पवार यांनी संरक्षणमंत्री यांना आवर्जून सांगितले.

के.के.रेंजबाबत यापुढे कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, संरक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात प्रथम बैठक होईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री सिंह यांनी दिली. यावेळी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-