कधीकाळी पावसाळयातही टॅकर मागवणारे गाव आज दुसऱ्यांना पुरवतेय पाणी

success story of lodhwade village

विरेश आंधळकर: महाराष्ट्रामध्ये सध्या फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई भासू लागली आहे. अपुऱ्या पावसामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. आणखीन संपूर्ण उन्हाळा काढायचा असल्याने या दरम्यान पाण्याची काय अवस्था होईल याचा विचार करूनच डोके गरगरायला लागते.पण आज ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली याचा विचार करणे गरजेचं आहे. गावामध्ये 12 महिने सुरु असणारे बिनकामाचे राजकारण, ह्याला आडव त्याची जिरवचे कुरघोडीचे राजकारण यामुळे अनेक गावांच्या विकासाला खीळ बसली आहे. मात्र अशातही दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या साताऱ्यातील माण तालुक्यातील लोधवडे गावाकडे पाहिल्यावर कळत कि गावकऱ्यांनी एकी केल्यास काहीही अशक्य नाही. कधीकाळी पावसाळयातही टॅकर मागवणारे लोधवडे आज दुसऱ्या गावांना पाणी पुरवत आहे. विशेष म्हणजे या गावाला पाहून आमीर खानने वाॅटरकप स्पर्धा ही स्पर्धा सुरु केली आहे.

लोधवडे ग्रामपंचायत इमारत

 

२०१० – ११ पर्यंत लोधवडे गावची स्थिती ही सतत दुष्काळी आणि पिण्याच्या पाण्यासाठी देखील दुसऱ्यांवर अवलंबून असणारी होती. शेतजमीन उथळ व हलक्याप्रतीची असल्याने पावसाळ्यात देखील पिक घेणे अवघड होते. मात्र अशा परीस्थीतीवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सामुहीक प्रयत्न केल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो याचे लोधवडे हे उदाहरण आहे. घरातील एक व्यक्ती शिकल्यावर संपूर्ण घर प्रगती साधते याप्रमाणे लोधवडेचे सुपुत्र सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी गावकऱ्यांना एकत्र करत कामाला सुरुवात केली. त्यामुळेच गेली २५ वर्षांपासून ग्रामपंचायत असो कि विविध कार्यकारी सोसायटी गावामध्ये कोणतीच निवडणूक झाली नाही.

पाणी अडवण्यासाठी खोदलेले चर

प्रभाकर देशमुख यांनी गावासाठी योजना आणायची आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे श्रमदानकरून ती राबवायची असा धडाकाच या गावाने राबवला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी डोंगर तसेच माळरानावर चर खोदले गेले. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड देखील करण्यात आली त्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवाची संकल्पना सत्यात उतरली. दुसरीकडे गावाच्या शिवारातून जाणाऱ्या ९ किमी अंतराच्या ओढ्यांचे खोलीकरण करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी १७ बंधारे देखील बांधण्यात आले आहेत. त्यामुळे आज इतर ठिकाणी दुष्काळ दिसत असताना या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे.

बंधारा घालून ओढ्यांमध्ये अडवलेले पाणी

या गावाचे एकुण भौगोलिक क्षेत्र १२२३ हेक्टर असुन लागवडीलायक क्षेत्र ८६२ हेक्टर आहे. आधी केवळ कोरडवाहू पिके घेणाऱ्या लोधवडेत आज ६०२ हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत व उर्वरीत क्षेत्र हे सहामाही, आठमाही बागायत आहे. शेती हा गावातील मुख्य व्यवसाय असुन बागायत क्षेत्रात कांदा, ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमुग सारखी नफा मिळवून देणारी पिके घेतली जातात. आता हा झाला शेतीचा विषय पण लोधवडेकरांनी आणखीन काही गोष्ठी केल्या आहेत ज्या आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत.

गेली २५ वर्षांपासून ग्रामपंचायत असो कि विविध कार्यकारी सोसायटी गावामध्ये कोणतीच निवडणूक झाली नाही. उलट गावची पूर्ण सत्ता ही महिलांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विकास कामात सर्वात मोठी अडचण ठरणारे राजकारणच गावातून हद्दपार झाले. घरातील महिला ही लक्ष्मी असते असे म्हंटले जाते हेच सत्यात उतरवण्याचे काम करत गावातील सर्व घर मिळकती महिलांच्या नावे नोंद करण्यात आल्या आहेत. तसेच लोधवडे हे १०० टक्के कुटुंबाकडे शौचालय असणारे गाव बनले आहे.

सिनेअभिनेता आमीर खानने लोधवडेला दिलेली भेट

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केलेलं मार्गदर्शन आणि गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत आज फळाला आली आहे. त्यामुळेच शासन आणि खासगी संस्थांकडून दिले जाणारे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. यामध्ये संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, निर्मल ग्राम, मुलस्थनी जलसंधारण अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, यशवंत पंचायत राज अभियान, पर्यावरण विकास रत्न आणि पाणलोट समितीस संत कान्होपात्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.