सिल्लोड तालुक्यात भाजपच्या आंदोलनाला यश; मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा!

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतीमालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. नुसकान भरपाईसाठी भाजपतर्फे सोयगाव तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. तसेच भारतीय जनता पार्टी सिल्लोडच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. उपविभागीय कार्यालय सिल्लोड येथे ४ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषण सुरू होते. अखेर अकराव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषण व मोर्चाचा धसका घेऊन सोयगाव तहसीलदार यांनी ८३ गावांमध्ये ३५ हजार हेक्टर तर सिल्लोड तहसीलदार यांनी सिल्लोड तालुक्यातील १३१ गावांमध्ये ५० हजार हेक्टरमधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला. या अनुषंगाने शासनाने अत्यंत तुटपुंजी रक्कम मदत म्हणून जाहीर केली असून तहसीलदार विक्रम राजपूत यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही पाठविलेल्या नुकसानाच्या अहवालानुसार सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये सुमारे १०० कोटी रुपये मदत मिळणार असल्याचे सांगून आपण करत असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

त्यामुळे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. उपोषणाची सांगता झालेली असली तरी हा लढा अजून संपलेला नाही. शेतकरी बांधव एकत्र आले. सामान्य नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी शेतकरी बांधवांना पाठिंबा दिला. यातच आंदोलनाचे यश आहे. त्यानंतर सरकारने केलेली तुटपुंजी मदत म्हणजे आपल्या आंदोलनाने कुंभकर्णी सरकारला जागे करण्याचे काम झाले. आता येत्या काळात आपण आपल्या हक्काची संपूर्ण मदत मिळवून घेऊ. तो पर्यंत हा लढा सुरू असेल असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर,भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, माजी चेअरमन श्रीरंग साळवे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या