११ तासांनतर वाळुजमधील आग विझवण्यात यश, कोट्यवधींचे नुकसान

औरंगाबाद :वाळूज एमआयडीसी परिसरातील डी सेक्टरमध्ये प्लाँट क्र डब्ल्यू 97 या भुखंडावर उद्योजक अशोक थोरात यांच्या दर्शन ग्रुपची ध्रुवतारा नावाची कंपनी आहे. या कंपनीत व्हँराक कंपनीसाठी लागणारे चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या वाहनासाठी इंडीकेटर, लाईट, वायर असे प्लास्टिकच्या पार्टचे उत्पादन घेतले जाते. बुधवारी (दि.३) कंपनी सुरू असताना भल्या पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान ही घटना कामगारांच्या वेळीच लक्षात आली. यामुळे सर्व कामगारांनी बचावासाठी कंपनी बाहेर धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुमारे ११ तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.

या घटनेत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीस आणि महानगरपालिका, गरवारे, बजाज, वाळूज अग्निशमन विभागाला कळताच पोलीस-जवानांनी घटनास्थळी धाव घेत सकाळी ११ वाजेपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी करोडो रूपयांचा कच्चा आणि पक्का माल जळून कोळसा झाल्याचे कंपनी मालक अशोक थोरात यांनी सांगितले. या आगीचे लोट बुधवारी सकाळी वाळूज एमआयडीसी परिसरात धुमसत होते.

या कंपनीत दोन शिफ्ट मध्ये २०० च्या जवळपास कामगार काम करतात. रात्रीच्या वेळी ७० कामगार काम करत असतात. बुधवारी रात्री ६० च्या जवळपास कामगार काम करत होते. रात्री अचानक २ वाजेच्या सुमारास आग लागली. याबाबत वाळूज अग्निशमन विभागाला रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी कळवण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख के ए डोंगरे, एस आर गायकवाड हे दोन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा आग आटोक्यात न आल्याने औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचा एक फायर बंब, गरवारे आणि बजाज कंपनीचे फायर बंब आणि ३ खाजगी टँकर मागवण्यात आले. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ११ वाजेच्या आसपास आग विझवण्यात फायर ब्रिगेड ला यश आले.

फायर विभागाचे चाललंय काय?
वाळूज एमआयडीसी परिसरात लागलेल्या या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीत फायरची कोणतीही व्यवस्था नसल्याचे कामगारांनी सांगितले. फायरची गाडी येण्यासही बराच वेळ लागला, तर काही मिनिटातच वाळूज एमआयडीसी फायरच्या गाडीचे पाणी देखील संपले. गाडयांना कंपनीत जाण्यासाठी देखील व्यवस्था नसल्याने आग विझवण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. फायर ऑडिट करताना या सर्व गोष्टी फायर विभागाला दिसल्या नाही का ? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यापूर्वीही अशा आगीच्या अनेकवेळा वाळूज एमआयडीसी मध्ये घडल्या असून त्यातून विभागाने काही शिकावे की नाही हा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

रुग्णवाहिका आली पण डॉक्टर घरीच
घटना घडल्यानंतर सकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान वाळूज विभागाची १०८ ऍम्ब्युलन्स आली. तर ५ वाजेदरम्यान दुसरी ऍम्ब्युलन्स आली.  मात्र या ऍम्ब्युलन्समध्ये देखील डॉक्टर उपस्थित नसल्याने १०८ च्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे. अनावधानाने या आगीत जर काही दुर्घटना घडली असती तर डॉक्टर अभावी अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला असता. याविषयी १०८ चे झोनल मॅनेजर तुषार भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. अशा अनेक वेळा डॉक्टर नसल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे वरिष्ठांचे विभागाकडे लक्ष आहे का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

प्लास्टिकमुळे आग विझवताना अडचण
प्लास्टिक विझवताना पाण्याचा मारा करत असताना पान्यामुळे प्लास्टिक अधिक आग घेत होते. त्यामुळे आग विझवत असताना मोठ्या अडचण निर्माण झाली. त्यातच कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने काही मिनिटातच कंपनी आगीच्या भक्षस्थानी गेली. ही आग विझवण्यासाठी फोमची आवश्यकता असते. परंतु अग्निशमन विभागाच्या फोमच्या अडचणीमुळे आग विझवताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती.

महत्वाच्या बातम्या

IMP