ओवेसींनी लष्करावर हल्ले करणारे दहशतवादी मुस्लीमही मोजावेत -स्वामी

टीम महाराष्ट्र देशा- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पाच मुस्लीम जवानांचे प्राण गेले होते, परंतु त्यांची कुणी दखल घेतली नाही, पंतप्रधानांनीही ट्विट केलं नाही अशी टीका असदुद्दीन ओवेसींनी केली होती . या वक्तव्यानंतर ओवेसी यांच्यावर चौफेर टीका होत असताना आता भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील हल्ला चढवला आहे. भारतीय मुस्लीमांचा दाखला देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी लष्करावर हल्ले करणारे दहशतवादी मुस्लीमही मोजावेत अशी टीका भाजपाचे नेते स्वामी यांनी केली आहे.

शहिदांच्या मुद्द्यावरून राजकारण करू पाहणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांना ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे राजकीयीकरण करू नये असं सांगताना लष्करात धर्माला स्थान नसतं असंही सुनावलं होतं. आता, स्वामी यांनी ओवेसींवर हल्ला चढवला असून शहीदांप्रमाणेच त्यांनी दहशतवादी असलेल्या मुस्लीमांचीही गणना करावी असा सल्ला स्वामींनी ओवेसींना दिला आहे. गुरुवारी सकाळी ट्विटच्या माध्यमातून स्वामींनी आपलं मत व्यक्त केलं असून त्यावरून वादविवाद झडण्याची शक्यता आहे.