अजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश

अजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश

Abdul Sattar

औरंगाबाद : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील गोदावरी – तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी अधिकच्या सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा. तसेच यासाठी प्रभावी नियोजन करून दिवाळीपूर्वी याबाबत शासनास प्रस्ताव सादर करा असे निर्देश, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

सिल्लोड – सोयगाव तालुक्यात गोदावरी व तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून येथे नवीन सिंचन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने फर्दापूर ता. सोयगाव येथेल शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गोदावरी व तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. याबैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वरील निर्देश दिले.

भराडी प्रकल्प रद्द झाल्यामुळे पूर्णा नदीवर सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी फेर नियोजन करून पूर्णा नदीवर स्वयंचलित अत्याधुनिक बंधारे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करणे, अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत. शिवाय यासाठी कोणतीही जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करा. येथे पाणी अडविल्यास लिफ्ट इरिगेशनने याभागात पाण्याची उपलब्धता करता येईल. यासाठी अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच अजिंठ्याच्या खोऱ्यात अधिक सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करावी, सिद्धेश्वर खोऱ्यात पाणी साठवण व नियोजन करणे, शिवना ते अजिंठा गावाच्या रस्त्याने असलेल्या गायरान जमिनीवर नवीन पाझर तलावासाठी सर्वेक्षण करणे, जुई नदीचे पाणी वाहून जाते सदरील पाणी अजिंठा – अंधारी प्रकल्पात वळविण्यासाठी उपाययोजना करणे, सिल्लोडच्या खेळणा व सोयगावच्या गुगडी प्रकल्पाची जल साठवण क्षमता वाढीसाठी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात सर्व निकष व नियमांच्या अधिनराहून उपायोजना करणे आदी विषयांवर या बैठकीत निर्देश देण्यात आले.

सोयगावच्या सावळतबारा, जामठी, माळेगाव पिंप्री, जंगला तांडा, देव्हारी, बहुलखेडा तर सिल्लोड च्या हळदा, नानेगाव, जंजाळा, केळगाव, मुर्डेश्वर ते घाटनांद्रा पर्यंतच्या पाणलोट क्षेत्रात जास्तीत जास्त सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. सिंचनाच्या झालेल्या सर्वेक्षणाचे क्रमवारी विभागणी करून येत्या वर्षात प्राधान्याने करण्यात येणाऱ्या कामाचे दिवाळीपूर्वी शासनास प्रस्ताव सादर करून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या बातम्या