धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा

navab malik

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री ऑडिओ क्लीपमध्ये सरळसरळ धमक्या देत आहेत. ते विरोधकांवर हल्ले करण्याची चितावणीखोर भाषा वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

पालघरमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लीप ऐकवून दाखवली. त्यामधील मुख्यमंत्र्याची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा. मी सर्वाधिक मोठा गुंड आहे असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची भाषा ही चितावणीखोरपणाची आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप निवडणूक आयोगाने ऐकून त्याची खात्री करुन किंवा वेळ पडल्यास फॉरॅन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवावी आणि पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

पालघर,भंडारा-गोंदिया पोटनिवडणूका पराभूत होत असल्याचे लक्षात येताच भाजप साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बळाचा वापर आणि पैशाचा वापर भाजपकडून केला जात आहे. कालच पालघरमध्ये पैसे वाटणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शिवसेनेने ही ऑडिओ क्लीप बाहेर काढली आहे ती सभेत जनतेसमोर पुंगी म्हणून न वाजवता हिम्मत असेल निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. त्यावर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.

नेमकं काय म्हटलं आहे या क्लीपमध्ये?

देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचं.. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लीपमध्ये म्हटले आहे.

Loading...