सोलापूर विद्यापीठ नावारूपास आणा, युवा महोत्सवाच्या संधीचे सोने करत उत्तम करियर घडवा: देशमुख

subhash deshmukh

सोलापूर- युवा महोत्सव ही युवा विद्यार्थी कलावंतांसाठी एक मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करत कलाक्षेत्रात उत्तम करिअर करा. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेऊन वैभवशाली सोलापूर जिल्हा घडविण्यासाठी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला नावारूपास आणण्याचे आवाहन सहकार व मदत पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

गुरुवारी, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे लोकमंगल विज्ञान व उद्योजकता विकास महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी सहकारमंत्री देशमुख हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी सायबर मुंबईचे पोलीस अधिक्षक बालसिंग रजपूत, लगिर झालं जी फेम तथा सिने अभिनेता राहुल मगदूम, प्र कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे, लोकमंगल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, सचिवा अनिता ढोबळे यांच्यासह विद्यापीठ प्राधिकरण व युवा महोत्सव समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लोकमंगल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. माळी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी संस्थेचा आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी युवा महोत्सवाचा आढावा सादर केला.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, शिक्षण तसेच युवा महोत्सव ही विद्यार्थी कलावंतासाठी एक संधी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचं तसेच चांगल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्वप्न पाहिलेलं असतं, त्या स्वप्नपूर्तीसाठी आपापल्यापरीने प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक माध्यम म्हणून मी प्रयत्न करीत आहे. सळसळत्या तरुणाईने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रामाणिक आणि गुणवत्ताभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. श्रीकांत धारूरकर यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी मानले.

विद्यापीठात कलाक्षेत्राविषयी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फाईन अँड आर्ट स्कूल सुरू करण्यात आल्याची माहिती देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कलाक्षेत्र हे विद्यार्थ्यांना एक करिअर करण्याचे उत्तम राजमार्ग असल्याचे स्पष्ट केले. या माध्यमातून विद्यापीठामध्ये चित्रकला, संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग सुरू होत आहेत. कला ही एक शास्त्रशुद्ध संस्कृती आहे. यंदाचा सोळावा युवा महोत्सव लोकमंगल महाविद्यालयात अतिशय उत्साहात सुरू होत आहे. यासाठी गत वर्षापासून 12 लाखाचा निधी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन ही थीम घेऊन यंदाचा युवा महोत्सव लोकमंगल महाविद्यालयात दर्जेदार होईल, याची खात्री आहे. युवक-युवतींनी आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी शिस्तबद्धरित्या कलेचे सादरीकरण करावे आणि सोलापूरचं नाव पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.

कलेला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड द्या

युवा महोत्सव हा उन्मेशाच्या सृजनरंगाचा आणि नवनिर्मितीचा कार्यक्रम असून या माध्यमातून युवा विद्यार्थी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळतो. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आल्याने खऱ्या अर्थाने स्त्रियांचा उद्धार आणि सन्मान आज होताना पाहावयास मिळत आहे. कलेमध्ये एक ऊर्जा आहे, मात्र कलाकारांना संघर्षही करावा लागतो. काळानुरूप जो बदलतो, तोच या प्रवासात टिकतो. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कलेला महत्त्व वाढले आहे. तरुणाईला या माध्यमातून एक व्यासपीठदेखील मिळत आहे. त्यामुळे आजच्या युवा कलावंतांनी आपल्या कलेला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन आपली कला संपूर्ण जगभर प्रदर्शित करावे, असे आवाहन सायबर मुंबईचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी केले.

गुणवत्ता असेल की, लोक शोधत येतील

शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या युवा महोत्सवामधूनच आपण घडून आज अभिनय क्षेत्रात कारकीर्द करीत असल्याचे सांगून आपल्याकडे जर गुणवत असेल तर लोक आपल्याला शोधत येतात, असे प्रतिपादन लागीर झालं जी फेम राहुल मगदूम यांनी केले. प्रामाणिकपणे आणि गुणवत्ताभिमुख काम करणे आवश्यक आहे. युवा महोत्सवामुळेच आपली पाया ही भक्कम होत असते. आज भरपूर संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.