हुरडा कुठला खायचा तर सोलापुरचाचं – सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्याचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्रसिद्ध गोष्टीचे ब्रँडिंग व्हायला हवे. आजकाल आम्ही सुरती हुरडा ऐकतो पण राज्यात आमच्या सोलापूरचा हुरडाच प्रसिद्ध आहे आणि तोच खायचा असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला साथ देण्यासाठी पुण्यामध्ये राहणाऱ्या सर्व सोलापूरकरांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन आता जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणे गरजेचं आहे. ज्या मायभूमीन मला मोठं केलं त्यासाठी आता प्रयत्न करत आहे, सुरुवातीला काही मूठभर लोकांना सोबत घेऊन लोकमंगलच्या माध्यमातून काम करत आलो. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना रोजगार निर्मितीवर काम केलं आहे. आता सर्वाना सोबत घेऊन सोलापूरला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन करण्याचे आवाहन सुभाष देशमुख यांनी यावेळी केले.

मुळ सोलापूर जिल्ह्यातील मात्र नौकरी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यामध्ये स्थिरावलेल्या सोलापूरकरांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना केली आहे. फाउंडेशनच्या वतीने रविवारी पंडित फार्म येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्याच्या विकासासाठी काय रणनीती असायला हवी चर्चा करण्यात आली.