कोंबड्या सांभाळा,कोंबडी चोर आलेत – सुभाष देसाई

Subhash-Desai,

टीम महाराष्ट्र देशा :शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत,  तेव्हा भाजपावाल्यांनो आपल्या कोंबडय़ा सांभाळा, अशी जहरी टिका करताना भाजपवाले राणेंना सडवून नव्हे, तर कुजवून  ठेवतील, असा टोला उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे कोकण विभागीय संपर्क प्रमुख सुभाष देसाई यांनी मारला.

साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी सध्या सुरु असलेल्या राजकारणासह नारायण राणेआमदार, नितेश राणे आणि भाजपवर त्यांनी घणाघाती टीका केली .

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा एनडीएतील सहभागाबाबत देसाई यांनी शेलक्या शब्दात टीका केली . ते म्हणाले, कोकणात गेले काही दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये डाळ शिजत नाही, म्हटल्यावर नारोबाने भाजपचा आश्रय घेतला आहे. ते करतानाही थेट पक्षात जायचे सोडून वाकडी वाट निवडली आहे. पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान ठेवले. काँग्रेस सत्तेत टिकून राहील. असे वाटल्यानंतर राणेंनी शिवसेना सोडली. आता भाजप सत्तेवर टिकून राहणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रसला सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. ज्यांनी भाजपपुढे लोटांगण घातले, त्या पक्षाचे नाव स्वाभिमानी ठेवले आहे. निवडणूक आयोगानेही त्याचा अर्थ विचारला पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी देसाई यांनी केली.