विद्यापीठा विरोधात विद्यार्थी संघटनांचा एल्गार

uni pune

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठ वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच  चर्चेत असते .मध्यंतरी  विद्यापीठात जयकर ग्रंथालयातील  विद्यार्थांची  पुस्तके बाहेर फेकण्यात आली होती सोबत सेट विद्यार्थी प्रकरण, अभियांत्रिकी क्षेत्रातील भ्रष्ट कारभार समोर आला आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासन काहीच निर्णय घेत नसल्यामुळे विद्यापीठा विरोधात सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत.

तांत्रिक चुकामुळे सेट परीक्षेत विद्यार्थांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्याविरोधात विद्यार्थांनी उपोषण देखील केले. यावर कुलगुरू नितीन करमाळकर यांनी समिती स्थापन करून सदस्यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. मात्र आता दीड महिना झाला तरी विद्यापीठाकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही किंवा कोणताच अहवाल देखील सादर केला नाही त्यामुळे  स्थापन केलेली समिती फक्त दिखाऊपणा होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळा विरोधात सर्व विदयार्थी संघटना आक्रमक झाल्या असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कुलगुरू नितीन करमाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती जेडीयु चे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडीस आले होते. या विरोधात शहरातील सर्व विदयार्थी संघटनांनी कुलगुरूंना घेराव देखील घातला होता. मात्र  विद्यापीठाने त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

या संदर्भात प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम म्हणाले सेट प्रकरणी अहवाल पाठविला आहे. तसेच पेपर फुटी संदर्भात चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार  आहे.या आणि विद्यापीठातील महत्वाच्या विषयांवर उद्या पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे .