दहावीतील विद्यार्थ्याचा खून प्रेमप्रकरणातूनच, दाेघे ताब्यात

सोलापूर  – प्रेमप्रकरणातूनच दहावीतील मित्राचा वर्गमित्रांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश कारंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. दरम्यान, एका मुलीवरील एकतर्फी प्रेमातून महेश हा सतत आम्हाला त्रास द्यायचा. त्यानेच लपवलेल्या कोयत्याने त्याचा खून केल्याची कबुली दोन अल्पवयीन मुलांनी दिली.

पिरळे (ता. माळशिरस) विद्यालयातील संगणक कक्षात संशयितांनी वर्गमित्र महेश कारंडे याचा लोखंड गज व कोयत्याने वार करून खून केला. नंतर दोघांनी कक्षाला कडी लावून कुलूप नुसते अडकवून दुचाकीने दहिगावच्या दिशेने पोबारा केला. दहिगावात गाडी ठेवून ते बारामतीला गेले होते. नातेपुते पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. संशयित बारामती येथील त्यांच्या नातेवाइकाच्या घरी गेले होते. पोलीस पोहोचण्याआधी त्यांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी संशयितांच्या वडिलांसह नातेवाईकांच्या मदतीने पहाटे नीरा वाघज येथून त्यांना ताब्यात घेतले.