आत्महत्येचा अभिनय करताना गेला जीव

टीम महाराष्ट्र देशा- शोभायात्रेच्या चित्ररथात शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारताना गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 2 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे घडली. मनोज अरुण धुर्वे असे या तरुणाचे नाव असून तो रामटेक तालुक्यातील संग्रामपूरचा रहिवासी होता.

यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार रामटेक येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ साकारले जातात. समाजातील वास्तव आणि समाजप्रबोधन यावर आधारित चित्ररथांचा या शोभायात्रेत समावेश असतो. रामटेक येथील अठराभुजा गणेश मंदिरात गणेशाचे पाद्यपूजा केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास या शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत धार्मिक, सामाजिक, पौराणिक आणि सांस्कृतिक विषयावरील चित्ररथ सहभागी करण्यात आले होते.

काहींनी जिवंत देखावे तयार केले. त्यापैकीच ‘शेतकऱ्याची आत्महत्या’ या चित्ररथात मनोज धुर्वे हा गळफास लावलेला शेतकरी म्हणून सहभागी झाला होता. बसस्टँडमार्गे शोभायात्रा आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. तेथून पुढे जाऊन गांधी चौकात रात्री 11.30 वाजताच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोजकांना शंका येताच त्यांनी मनोजला रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ‘शेतकरी आत्महत्या’साठी त्याने उपयोगात आणलेल्या दोराचाच गळफास लागून मनोजचा मृत्यू झाला. मनोजला अशाप्रकारे आलेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.