विद्यापीठ प्रशासनाचा आडमुठेपणा; महिला अधिकारी करतेय जमिनीवर बसून काम!

dr.bamu

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात पदव्युत्तर विभागाच्या सहाय्यक कुलसचिव हेमलता ठाकरे गेल्या २ महिन्यांपासून बसण्याची व्यवस्था न केल्याने जमिनीवर बसूनच कामकाज करत आहेत. यासोबतच वारंवार एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणे, काम करत असतांना दबाव आणणे या गोष्टीही त्यांच्यासोबत करण्यात आल्या. परीक्षा विभागात सुरू असलेल्या काही अनधिकृत आर्थिक बाबींच्या विरोधात पावले उचलल्याने तसेच त्यात हस्तक्षेप केल्याने आपल्याला ही वागणूक दिल्याचे ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले.

अधिकाऱ्यांना काम करण्याहेतु पदानुसार जागा, खुर्ची, टेबल उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, ठाकरे यांना बसण्यासाठीची खुर्चीही विद्यापीठाने दिलेली नाही. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे ठाकरे यांनी वेळोवेळी मागणी सुद्धा केली आहे. आपल्यावर आत्तापर्यंत झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी वेळोवेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदने दिली आहेत. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या या निवेदनांना केराची टोपली दाखवत सरळ दुर्लक्ष केले. सध्या त्यांची अभ्यासक्रम विभागात बसण्याची व्यवस्था केलेली आहे.

ती जागा कामासाठी संयुक्तिक नाही. ज्या जागेवर बदली झाली तो पदभारही अजूनपर्यंत त्यांना देण्यात आलेला नाही. मात्र याबाबत कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले की, सहायक कुलसचिव हेमलता ठाकरे यांना दोन महिन्यापूर्वी केबिन दिली पण, तेथे बसण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यांना कंबरेचा त्रास असल्याने त्या खालीच बसतात. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे दिसून येत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नागराज गायकवाड यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या