धुळ्यात रेल्वे स्थानक रोडवर अतिक्रमणधारकांचा ठिय्या

dhule

धुळे : येथील स्थानक रोडवरील अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेत येऊन प्रवेशव्दारासमोरच ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी झालेल्या चर्चेत पुनर्वसनाबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा ठिय्या कायम होता.महानगरपालिकेने २६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानक रोडवरील अतिक्रमण जमिनदोस्त केले़ न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत २२२ निवासी व २२ व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात आली़ त्यानंतर अतिक्रमित कुटूंबांना रस्त्यावर राहावे लागत असून त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे़.

दरम्यान,अतिक्रमणधारकांचा मोर्चा आनंद बागुल यांच्या नेतृत्वात मनपावर धडकला़ मनपाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांनी प्रवेशव्दारासमोर ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी १५ ते २० जणांचे शिष्टमंडळ गेले़ आयुक्तांनी अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन मनपा करणार असून सर्व २२२ अतिक्रमणधारकांची यादी द्यावी, अशी भुमिका मांडली़ यशवंत नगर किंवा मोहाडी येथे घरकुले दिली जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़ मात्र त्यास अतिक्रमणधारकांनी विरोध केला़ दसरा मैदान किंवा मनपा शाळा क्रमांक २९ ची जागा देण्यात यावी, घरकुले नको असल्याची भुमिका अतिक्रमणधारकांनी घेतली़ आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने अतिक्रमणधारकांनी मनपा प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे़