आरटीओकडून कोरोना नियमांना हरताळ; चाचणी न करताच नागरिकांना प्रवेश

corona test

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. शहरातील सर्व सरकारी कार्यालयात प्रवेश करताना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आरटीओ कडून मनपाच्या या नियमांना हरताळ फासले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ कार्यालयात येणारे नागरिक कोरोना चाचणी न करताच प्रवेश करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरटीओला कोरोनाचे नियम लागू होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरा संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले होते. त्यावेळी महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व सरकारी कार्यालयात कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, उच्च न्यायालय, आरटीओ या सर्व ठिकाणी तेव्हापासून आजपर्यंत कोरोना चाचणी सुरू आहे. मात्र सुरुवातीला अतिशय गंभीरतेने चाचणी करून घेणारे नागरिक आता चाचणी न करताच कार्यालयात उघडपणे जात आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून ९ सरकारी कार्यालयात कोरोना चाचणी नियमित केली जात आहे. या केंद्रांवर आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन चाचणी केली जाते. मात्र चाचणी न करताच नागरिक कार्यालयात प्रवेश करीत आहे. आरटीओ अधिकार्‍यांकडून चाचणी करणार्‍या कर्मचार्‍यांना बंदोबस्त दिला जात नसल्याची तक्रार कर्मचार्‍यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे केली. डॉ. मंडलेचा यांनी तातडीने आरटीओ अधिकार्‍यांशी संपर्क साधत बंदोबस्त देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा केंद्र बंद करून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या