सातारा, कराड शहरात कडक लॉकडाऊन ; विनाकारण फिरणार्‍यांच्या गाड्या जप्त

satara

सातारा : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता राज्यातील विविध भागांमध्ये स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवासात २५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळं लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सीईओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली होती.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात आजपासून सात दिवसांच्या कडक लाॅकडाऊनला प्रारंभ झाला आहे. कराड शहरात तसेच सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त करून त्यांच्यावर केसेस दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी चांगली तारांबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सर्वंत्र सकाळी सात ते अकरा सुरू असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक बिनधास्त किरकोळ कारणांसाठी बाहेर पडताना फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणार्‍या शेकडो दुचाकी जप्त केले आहेत. अनेक वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या