साताऱ्या पाठोपाठ आता सांगलीतही कडक लॉकडाऊन; जयंत पाटलांनी केली घोषणा

jayant patil

सांगली : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता राज्यातील विविध भागांमध्ये स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवासात २५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळं लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सीईओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली होती.

आणि आता साताऱ्या पाठोपाठ सांगलीतही कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ‘काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत.

आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे.’ असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या