थकबाकी भरा अन्यथा बत्ती गुल; महावितरणची धडक कारवाई

औरंगाबाद – ऐन उन्हाचा कडाका आणि परीक्षेच्या काळात महावितरणने एक फेब्रुवारीपासून थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. या आधी पाच हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. आठ दिवसांपासून मात्र एक हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची थकबाकी वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे जे ग्राहक नियमित वीजबिल भरणारे आहेत, परंतु त्यांची मागील महिना व चालू बिलांची रक्कम एक हजारापेक्षा जास्त होत आहे आशा अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऐन उन्हाचा कडाका आणि परीक्षेच्या काळात ही कारवाई करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त एक महिन्याची थकबाकी असेल तर महावितरणने ग्राहकांसाठी थोडा वेळ द्यावा किंवा तशी माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.या संबंधात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

You might also like
Comments
Loading...