शिर्डीला जात असाल तर ही बातमी वाचाच, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला मोठा निर्णय

sai mandir

अहमदनगर : राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा काळात राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, जत्रा, यात्रा, यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बुलढाणा अमरावती या ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यभरात सोशल डिस्टेंसिंग तसेच मास्क लावण्याची बंधन घालण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी देवस्थाने देखील असाच निर्णय घेतला आहे. आता कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या भाविकांना दंड भरावा लागणार आहे. शिर्डी ग्रामपंचायतीने मंगळवारी ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविकांना यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार आता शिर्डीत कोणताही नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्याला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून पाच हजारांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने अवघ्या दिवसांत जवळपास 9 लाखांचा दंड वसूल केला आहे.

गेल्या दोन दिवसांत पुणे पोलिसांकडून रात्रीच्या संचारबंदींचे उल्लंघन करणाऱ्या 1700 जणांवर कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, काहीजण विनाकारण रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरताना आढळून आले. अशा लोकांवर पोलिसांनी संचारबंदी उल्लंघन कलमातंर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

महत्वाच्या बातम्या