मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.
अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर लगेचच अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी दैवत मानतो आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो असं कोणतंही कृत्य मी केलेलं नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांमध्ये घडलेला शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे आरोप ठरवून केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तिसऱ्या मंत्र्यांच नाव बाहेर आणू असं भाकीत करत होते.
मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. तसं करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या दिशेला वळवले जात आहे. मी नार्कोटिक्ससाठी देखील तयार आहे. ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडत आहे.’ असे मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा; निलेश राणेंचा प्रहार
- ‘सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी म्हणून निर्बंध’
- ‘बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’ गंभीर आरोपानंतर परबांच भावनिक स्पष्टीकरण
- पंढरपूर निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ हुकुमी एक्क्याला कोरोनाचा विळखा
- निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसलेत; भाजपची बोचरी टीका