पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य कशाप्रकारे उपाययोजना करत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद पंतप्रधान व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार आहेत.   याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला  होता.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा तिसरा टप्पा सुरु झाल्याचे सांगण्यात येते. या टप्प्यात समाज समूहातून हा विषाणू पसरु शकतो. या कालावधीत मोठी सावधानता बाळगावी लागते. गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार संघटितपणे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भातच उद्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात दीर्घ चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (बुधवार) फोनवरुन चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना काही सूचना केल्याचे बोलले जाते. निजामुद्दीन येथील मरकजहून आलेल्या व्यक्तींवर विशष लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्याचे सांगितले जाते.