‘निवडणुकीच्या काळात दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांची व्यथा’

अक्षय आखाडे : गेल्या चार वर्षात शेतकरी आत्महत्या व त्याची आकडेवारी पाहता काळजाला चुरका लावणारी आकडेवारी समोर येत आहे. सरकार कुणाचं जरी असले तरी शेतकरी आत्महत्या हा कायम कळीचा मुद्दा राहिलेला आहे. २०१५ ते २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्यांमध्ये निम्म्याने वाढ होऊन आत्महत्यांचा आकडा १२००० च्या आसपास पोहचला आहे, चालू वर्षी तर अत्यल्प पाऊस, दुष्काळ आणि त्याच्या बरोबर बेरोजगारी या समस्यांनी बळीराजाला चागलेच ग्रासले आहे.

निवडणुका लागल्या असल्या तरी दुष्काळावर आणि शेतकरी प्रश्नावर कोणीच बोलायला तयार होत नाही. आपल्याकडे निवडणुका आल्यावर जात,धर्म,राम मंदिर हे मुद्दे कायम समोर आणले जातात. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी कृषी क्षेत्रावर म्हणावी तितकी चर्चा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात. ‘सबका साथ सबका विकास’ हे वाक्य तोंडातून बोलण्याइतकच मर्यादित राहिलेले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाचा कायम उन्हाळा होत असतो. दुष्काळ अन् शेतकरीजीवन याबद्दल शेतकरी मित्रांशी त्याच्या जगण्याबद्दल साधलेला हा संवाद…

पहाटे साडेपाचला गावी दूध डेअरी उघडते, कडाक्याची थंडी असो अथवा कुरर दाट धुकं असो, सकाळी आठ वाजेपर्यंत दूध डेअरीवरती दूध पोहचवणे गरजेचं, शेतीला दूध हा जोडव्यवसाय का निवडला असा प्रश्न विचारल्यावर थोडंसं शिकलेला परंतु शेती करणारा शिवाजी गोसावी नावाचा तरुण बोलतो, शेतीतून नियमित उत्पन्न येणं ही खूप कठीण गोष्ट होऊन बसली आहे. दर दोन-तीन वर्षाआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेती ही “वांझ” असल्यासारखी भासू लागली आहे. थोडंसं काही पीक पिकलचं तर आपण कष्ट केलेला मोबदला मिळत नाही.

दूध व्यवसाय हा कायम चार पैसे देणारा व्यवसाय आहे. शिवाय दूध व्यवसायामूळे शेतीला खत मिळते. शिवाजी पुढे सांगतोय की, दूध व्यवसाय जरी उत्तम व्यवसाय वाटत असला तरी दुधाला सरकार प्रतीलिटर पाच रुपये अनुदान घोषित करते, पण दोन-दोन महिने दूध अनुदान रखडवले जाते. सध्या पोट जाळणारा दुष्काळ आहे, जनावरांना चारा, पाणी अन् खुराक या तिन्ही गोष्टी विकत घेऊन घालाव्या लागत आहेत. शिवाजी म्हणतात जिथे मी पाच गायीचा सांभाळ करायचो तिथे मी आता अवघी एक गाय संभाळत आहे.

Loading...

पुढे जयराम चोपडे यांच्याशी बोललो, याअगोदर दोन वेळेस तालुक्याला मी यांना पाहिलं होतं. थोडीशी विचारपूस केल्यावर समजल की, जयराम वडिलांना शेतीत मदत करतात. आमच्या झालेल्या संभाषणात जयराम सगतात,” शेतकरी जनता स्वावलंबी झालेली कोणत्याच सत्ताधारी लोकांना आवडत नाही अशी शेतकऱ्यांची आजची व्यथा आहे. आक्रमक होऊन जयराम बोलतात की, “आता पर्यंतच्या कोणत्याच सरकारने गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत, उलट गरिबी सुसह्य कशी होईल हे पाहण्यात आल”.

गरिबी नष्ट करायची की सुसह्य करायची हे सरकारने आगोदर ठरवल पाहिजे मग “मनरेगा” सारख्या योजना सफल होतील. ते पुढे बोलतात की, या घडीला शेतकऱ्यांना पाणी आणि चारा विकत घेणे खूप भयंकर गोष्ट होऊन बसली आहे. शेतकऱ्यांना चारा उपलब्ध होईल पण पाणी विकत मिळणे ही खूपच कठीण गोष्ट आहे यावर सरकार ने तात्काळ मदत करावी.

Loading...

Loading...

२००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असले तरी आगामी निवडणुका पाहता ही तात्काळ केलेली मलमपट्टी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव हवाय, ज्या वेळेस पाणी असते त्या वेळेस वीज बिलाचा कारण सांगून वीज जोडणी खंडित केली जाते यातून शेतकऱ्यांची आर्थिक होरपळ होत असते. शेतीला निदान १५ तास वीज आणि योग्य हमीभावचं शेतकऱ्यांना वाचवू शकतो असा विश्वास जयराम यांनी व्यक्त केला.

शेतीतून योग्य पैसा मिळत नाही म्हणून धनंजय गिरी यांनी कुक्कुटपालन हा शेतीला जोड-धंदा म्हणून निवडलेला आहे. जोड-धंद्याशिवाय शेती करणे ही तारे वरची कसरत धनंजय यांनी वाटते. पुढे बोलताना ते म्हणतात दुष्काळ आणि सरकारकडून होणारी पिळवणूक ही कायम पाचवीला पुजलेली समस्या आहे. आता शेतकऱ्यांच्या मुलांनीच पुढे येऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल पाहिजे. शेती करणाऱ्या लोकांचा टक्का कमी होत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात घट आली तर शेतीवर चालणारे इतर उद्योग किती चागल्या प्रकारे चालतात याचा सर्व्हे करायला हवा अस धनंजय बोलतात.

माझ्या शेतकऱ्यांशी हितगुज साधण्याच्या ओघात मी दादासाहेब गावडे या फळशेती करणाऱ्या शेतकऱ्याशी बोललो. शेतीशी निगडित मी अनेक गोष्टी वाचत असतो अस ते आवर्जून असतात.एका पानटपरीवर पान खात मी त्याच्याशी बोलत होतो, रंगणाऱ्या पानासोबत आमच्या गप्पा ही रंगत होत्या. दादासाहेबांच्या मते, जलयुक्तशिवार योजना तसेच पाणी फाऊंडेशन या चांगल्या योजना आहेत. शिवाय पाणी फाऊंडेशन मुळे शेतकरी वर्गात एकोपा होतो आहे ही सकारात्मक गोष्ट आहे असं ते नमूद करतात.

पाणी फाऊंडेशनमूळे गेल्या वर्षी गावात जल-संधारणाची कामे झाली आहेत पण आता पावसाची प्रतीक्षा आहे. पाणी फाऊंडेशनमुळे जल क्रांती होईल, ते आमीर खान यांचं विशेष कौतुक करतात. शेतीची चालू परिस्थिती पाहता, सत्ताधारी अन् विरोधकांनी काय करायला हवं असा प्रश्न विचारल्यावर दादासाहेब बोलतात, विरोधी बाकावर बसलेले पक्ष विरोधक म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. सरकार कुणाचं ही असो मीडियाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लावून धरले पाहिजे पण तसे होत नाही यावर ते नाराज होतात.

२०१४ या वर्षी महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होतं त्यावेळेस नोव्हेंबरमध्येच चारा छावण्या उपलब्ध होत्या. चालूवर्षी बिकट परिस्थिती असून सुद्धा मे महिना सुरु झाला तरी सत्ताधारी अनेक ठिकाणी चाऱ्या बद्दल चे प्रस्ताव काढत नाहीत, ही शेतकऱ्याची नाकेबंदी आहे “मदत नको योग्य हमीभाव हवा” असं ते बोलतात. ‘आता शेतकऱ्याला स्वतः त्याच्या हक्कांसाठी लढावं लागेल’ या शेवटच्या वाक्याने आमच्या संभाषणाचा शेवट होतो.