वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी राष्ट्रवादीचा प्रवक्ता बनलेल्या भूषण राऊतची कहाणी

टीम महाराष्ट्र देशा : आजच्या परिस्थितीत राजकारणामध्ये सर्वच पक्षांत घराणेशाहीचा सुळसुळाट पहायला मिळतो. नेत्याचा मुलगा नेताच होणार हे सध्याच ठरलेलं गणित, त्यामुळे सामान्य कुटुंबातील युवक राजकारणापासून दूर जात आहेत. पण अशातही कोणताही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कुटुंबातील तरुण थेट एखाद्या पक्षाचा प्रवक्ता बनल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट सध्या 24 वर्षीय तरुण असणाऱ्या अॅड भूषण राऊत या युवकाच्या रूपाने सत्यात उतरल्याचं पहायला मिळत आहे.

राज्य आणि देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे, यामध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची मुख्य जबाबदारी ही प्रवक्त्यांची असते. त्यामुळेच जुन्या-जाणत्या नेत्यांनाच आजवर प्रवक्तेपद देण्यात आल्याचं पहायला मिळत. मात्र, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या निवडीमध्ये भूषण राऊत या तरुणाचे नाव आल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले.

आपल्या शालेय जीवनापासून राष्ट्रवादीशी जुडलेल्या भूषण राऊतवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना भूषणला मिळालेल्या पदामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. भूषण राऊतने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये जीएस म्हणून देखील काम पाहिलं आहे, २०१३ साली पॅरीसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या वर्ल्ड युथ फोरममध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

कायद्याच शिक्षण घेत असताना समाजामध्ये आंतरजातीय विवाहावरून वाढत असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह संरक्षण आणि कल्याण कायद्याचा’ मसुदा करण्यामध्ये भूषणचा मोठा वाटा आहे, विशेष म्हणजे कायद्याच शिक्षण घेताना अशाप्रकारे मसुदा तयार करण्याचा हा भारतातील पहिलाचं उपक्रम होता.

विद्यार्थी विकास आघाडी, भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन सारख्या सामाजिक संघटनांमध्ये भूषणने काम पाहिलेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भूषण राऊत याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत विधिमंडळ कामकाजात समन्वयकाची भूमिका पार पाडली होती. तर विविध विषयांवर प्रसार माध्यमांतील चर्चांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याच काम देखील राऊत यांनी केल. दरम्यान, आता आजवरची कामगिरी पाहता पक्षाकडून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, सर्वात कमी वयात प्रवक्तेपद मिळाल्यानं त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.