नक्की वाचा : अँसिड अटैक सर्वाइवर ‘लक्ष्मी’ च्या आयुष्याबद्दल

टीम महाराष्ट्र देशा : नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या सोशल मिडीया ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकली. अँसिड हल्ल्यातील पिडीता लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित #Chhapaak (छपाक) या चित्रपटातील ती सकारत असलेल्या ‘मालती’  या पात्रातील तो फोटो आहे. आणि ती पोस्ट शेअर करताच चर्चांना उधान आले. जिचे पात्र खुद्द दीपिका बजावणार आहे ती मालती म्हणजे ‘लक्ष्मी अगरवाल’ नेमकी कोण याबद्दल सर्वाना कुतुहूल निर्माण झाले.

कोण आहे लक्ष्मी अगरवाल ?

लक्ष्मी अगरवाल हि दिल्लीतील एका सामान्य कुटुंबातील मुलगी.  २००५ मध्ये एका ३२ वर्षीय मुलाने तिने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या चेहऱ्यावर अँसिड फेकले. असा भयानक हल्ला होऊन देखील तिने कठीण परिस्थतीशी चार हात करत अँसिड हल्यातील पिडीतांसाठी काम करण्याचे ठरवले. ‘स्टॉप सेल एसिड’ ची ती संस्थापक आहे. २०१४ मध्ये तिला International Women of Courage Award मिळाला आहे.

दिल्लीच्या लक्ष्मी अगरवाल वर झालेल्या अँसिड हल्ल्याची कहाणी –

२००५  मध्ये १५ वर्षाच्या लक्ष्मीला एका ३२ वर्षीय मुलाने लग्नासाठी विचारले. त्या मुलाला ती गेल्या अडीच वर्षांपासून ओळखत होती. कारण तो मुलगा तिच्या मैत्रिणीचा भाऊ होता.आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु लक्ष्मीने त्याला साफ नकार दिला. त्यानंतर पुढील १० महिने त्याने तिला सतत त्रास दिला. शाळेत येता जाता तो तिची रस्त्यात वाट पाहत थांबायचा.
तो तिला वाट्टेल ते बोलायचा, कधी कधी तर गालात सुद्धा मारायचा. कारण त्याला माहित होते की, लक्ष्मी ने तिच्या घरी सांगितले तर तिच्या घरचे तिची शाळा बंद करतील आणि हे लक्ष्मीला कधीच मान्य नव्हते. तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची होती. तिचे गायिका बनण्याचे स्वप्न होते. तिची हि अवस्था तिला घरच्यांना देखील सांगता येत नव्हती.

तो तिला मेसेज करून त्रास देत. एके दिवशी ती दिल्लीच्या खान मार्केट ला जात असताना तो मुलगा आणि त्याच्या छोट्या भावाची प्रेयसी दोघेही तिची वाट पाहत रस्त्यात थांबले होते. तिला पाहताच त्यांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यांनी बियर च्या बाटलीमध्ये असिड आणले होते. त्या मुलीने धक्का देत  तिला खाली पाडले. आणि त्यांनी लक्ष्मी च्या चेहऱ्यावर असिड फेकले. लक्ष्मी बेशुद्ध झाली. लक्ष्मीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला आपण जिवंत जळतोय असे वाटत होते. एवढेच नाही तर,  त्यादरम्यान ती ३ वेळा फुटपाथ वरून खाली गेली आणि तिचा  ३ वेळा अपघात झाला.

त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती परंतु कोणीच तिच्या मदतीला पुढे येत नव्हते. लक्ष्मी त्यावेळी प्रचंड तडफडत होती. ती मोठमोठ्याने जीव ओतून ओरडत होती. प्लास्टिक वितळते तसा तिचा चेहरा वितळत होता. दरम्यान एका व्यक्तीने माणुसकी दाखवत तिची मदत करून तिला रुग्णालयात दाखल केले. जेव्हा तिने तिच्या वडिलांना मिठी मारली त्यावेळी तिच्या वडिलांचा शर्ट सुद्धा जळाला. पुढे तब्बल १० महिने तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर तिने एका आयुष्याला सुरुवात केली आणि समजाला एक प्रेरणा दिली. कोणाला कल्पना देखील करता येणार नाही अशा प्रसंगाला लक्ष्मी सामोरी गेली आहे. तिच्या साहसामुळे ती आयुष्यात काहीतरी बनू शकली. याची दखल घेत आता तिच्या आयुष्यावर सिनेमा येत आहे. हा सिनेमा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.