पहिल्याच दिवशी एसटीला तुफान प्रतिसाद, ७ हजार प्रवाशांनी केला प्रवास

औरंगाबाद : अडिच महिने बंद असलेली एसटी बससेवा २ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. आता कोरोनाचे नियम पाळून सोमवारपासून १०० टक्के बससेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी (दि.८) पहिल्याच दिवशी औरंगाबाद विभागातून १८० बसमधून सात हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनामुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले जात होते त्यामुळे एसटीला प्रवासी सेवा बंद करावी लागली. तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी आता एसटी बसकडे वळले आहेत. त्यामुळे २ जून पासून एसटीने पुणे धुळे, जळगाव, नाशिक, जालना आदी मार्गांवर प्रवासी सेवा सुरु केली आहे. पहिल्या दिवशी केवळ १४ ते १५ विविध मार्गांवर धावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी थोडा प्रतिसाद वाढल्याने २६ गाड्या सोडण्यात आल्या.

सोमवारपासून औरंगाबाद शहर पूर्णत: अनलॉक करण्यात आले आहे. शहरात शिथिल होणारे निर्बंध पाहता एसटी विभागाने देखील आता पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरु केली आहे. आत्ताच्या कडक निर्बंधांमध्येही औरंगाबाद एसटी विभागाचे २२ कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी एसटीने तयारी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी १८० बसेस मधून ७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. दिवसभरात पुणे, मुंबई, नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, लातूर, नांदेड, बीड, अकोला, शेगाव, यवतमाळ, सोलापूर, तुळजापूर, भुसावळ, मालेगाव, मलकापूर, शहादा आदी मार्गांवर सुमारे १८० बस धावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या