टीम महाराष्ट्र देशा : अकोले तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे. निळवंडे धरणाचे कालवे भूमिगत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच या आंदोलनात अकोले तालुक्यातील रस्त्यांची कामं आणि खिळपाट पाझर तलावाचं काम पूर्ण करा, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. तर आमदार वैभव पिचड हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
अकोले तालुक्यात कालव्यांवरून राजकारण होताना दिसत आहे. एकीकडे शेतकरी निळवंडे धरणाचे कालवे भूमिगत व्हावे अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे काही गावकरी या कालव्यांना विरोध करत आहेत.अनेक वर्षापासून १८२ गावे ही या कालव्यांची वाट पाहत असून वारंवार सरकार दरबारी मागणी करत आहेत. तर या मागणीला दाद देत सरकारने लोकसभा निवडणुकी आधी कालव्यांच्या कामाला सुरवात केली होती. मात्र काही गावांनी या कालव्यांना विरोध करत काम बंद पाडले.
तसेच या आंदोलनात इतर देखील मागण्या केल्या जात आहेत. अकोले तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे शासनाने आधी तालुक्यातील रस्त्यांची कामं पूर्ण करावी. तसेच खिळपाट पाझर तलावाचं काम देखील पूर्णत्वास न्यावे अशी देखील मागणी शेतकरी करत आहेत.