मिरजेतील नवरात्रीत श्री अंबाबाईला पशुबळीची प्रथा बंद

सांगली : मिरजेची ग्रामदेवता श्री अंबाबाई देवीला नवरात्रात दुर्गाष्टमीला पशुबळी देण्याची ३०० वर्षापासून सुरू असलेली जुनी प्रथा यावर्षीपासून कायमची बंद करण्याचा महत्त्वपूर्ण असा पुरोगामी निर्णय श्री अंबाबाई मंदिर विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता मेंढीऐवजी कोहळा कापण्यात येईल व त्याचाच तिलक श्री अंबाबाईच्या मस्तकावर लावला जाणार आहे.

श्री अंबाबाई मंदिर समितीच्या विश्‍वस्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस श्री अंबाबाई मंदिराचे अध्यक्ष बापूसाहेब गुरव, सचिव श्रीकांत गुरव, विनायक गुरव, श्रीकांत गुरव, प्रशांत गुरव, विवेक गुरव, सुनील गुरव व विश्‍वनाथ गुरव आदी उपस्थित होते. नवरात्रीत दुर्गाष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मेंढीचा बळी दिला जायचा व त्या मेंढीच्या रक्ताचा तिलक देवीला लावला जायचा. त्यानंतर मटण- भाकरी असा देवीचा नैवेद्य भक्तमंडळींना वाढला जायचा. हा सर्व विधी रात्रीतच व्हायचा. मात्र काही वर्षात या नैवेद्यासाठी मध्यरात्रीपासून भक्तांच्या मोठ्या रांगा लागू लागल्या होत्या.

काही वर्षापूर्वी मंदिरात कलशारोहण कार्यक्रमासाठी आलेल्या करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांनी या विधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या मंदिर परिसरात नवरात्रात नऊ संगीताची आराधना चालते. प्रत्येक वर्षी दुर्गाष्टमीला संगीत सभा होते. अशा पवित्र ठिकाणी निष्पाप कोकराचा बळी देणे मनाला वेदना देणारे आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली होती.

या प्रथेबाबत अनेक भाविकभक्तांनीही मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाकडे आपापली भूमिका मांडली होती. अशातच राज्य शासनानेही अशा प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रथा कायमची बंद करण्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवर व गुरव समाजातील जाणकार यांचीही मते जाणून घेतली असता त्यांनी या प्रथेस विरोध दर्शविला. श्री अंबाबाईस पशुबळी देणे चुकीचे असल्याची सर्वांची खात्री झाल्यानेच ही प्रथा कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बापूसाहेब गुरव यांनी सांगितले.