सुशील मोदी यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करणा-यांपैकी सहा संशयितांना राज्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी सुमारे १५० जणांवर खटला भरण्यात येण्याची शक्यता आहे. मंगळवार रात्र ते बुधवार पहाट या कालावधीत अटकेची कारवार्इ करण्यात आली. मंगळवारी वैशाली जिल्ह्यातील चकसिकंदरजवळ त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात सुशील मोदी यांना इजा झाली नाही. पण चार वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दगडफेक करणारे लोक हे राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे. मात्र, राष्ट्रीय जनता दल पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.