‘आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ’,शिवसेनेचा मोदींना टोला

sanjay raut

मुंबई: देशात वाढत असलेल्या महागाईवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून मोदींवर निशाना साधत संताप व्यक्त केला आहे. आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका. सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलही, पण वास्तवातील दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे त्याचे काय? 2022 मध्ये भारताचा विकास दर जगात सर्वाधिक होणार असेल तर त्याचा आनंद सगळय़ांनाच होईल. पण आता सामान्य माणसाला प्रचंड महागाईचे जे चटके बसत आहेत त्याचे काय? असा संतप्त सवाल सामनातून संजय राऊत यांनी केला आहे.

पोटाची खळगी कशी भरायची, आधीच ‘कोरोनाचा मार’ त्यात हा दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचीअर्थव्यवस्था या वर्षी 9.5 टक्के दराने वाढणार, 2022 मध्ये विकास दरात भारत जगाला मागे टाकणार, असे आणखी एक ‘गाजर’ दाखवले आहे. असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाना साधला आहे.

सरकारला वाटते तेव्हा या आकडय़ांच्या फुग्यांमध्ये हवा भरली जाते किंवा काढली जाते. त्याचा वस्तुस्थितीशी ताळमेळ असायलाच हवा असे काही नसल्याने अनेकदा हे सरकारी आकडे ऐकले की, सामान्य माणसाला ‘आकडी’च येत असते. आतादेखील सामान्य माणूस महागाई आणि रोजच्या इंधन दरवाढीच्या वणव्यात होरपळत असताना केंद्र सरकार महागाई दरात घट झाली, खाद्य महागाई कमी झाली असे दावे करीत आहे. सगळी गंमतच सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज नवनवे विक्रम करीत आहे. सामान्य माणसाचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे आणि सरकार म्हणत आहे की, महागाईचा दर घटला, खाद्य महागाई अवघ्या 0.68 टक्क्यांवर आली. असे जर असेल तर मग बाजारात जी दरवाढ आणि महागाई दिसते आहे ते काय आहे? असा खोचक सवाल सामनातून संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या