‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय

‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, आजच्या बंद दरम्यान राज्यभरातील एसटी बस सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र, स्थानिक जिल्ह्यात बससेवा सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंतची एकंदरित स्थिती पाहता दिवसभर एसटी सेवा सुरू राहिल अशी शक्यता दिसत आहे. तर दुसरीकडे बससेवा सुरू असली तरी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी नसल्याचे चित्र दिसत आहे.

आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत. तर शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र बंदला समर्थन नसल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (एफआरटीडब्ल्यूए) स्पष्ट केले आहे. संघटनेचे प्रमुख प्रमुख वीरेन शहा म्हणाले, गेल्या १८ महिन्यांत लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता सणासुदीमुळे ग्राहकी वाढली असताना आमचा व्यापार अबाधित राहू द्यावा, असे आम्ही सरकारला आवाहन करत आहोत. दुसरीकडे, पुणे व्यापारी महासंघाने महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या