आता आम्ही ‘हम’ मोडमध्ये, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती करून राज्यात प्रचंड यश मिळवलं आहे. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत येऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान या बातम्यांचं खंडन करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून सगळं खुसखुशीत चालू असल्याचं वक्तव्य केलं आहे.

तर मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपतल्या सर्व कुरबुरी संपल्या असून आता सगळं खुसखुशीत आहे. भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही असंही राऊत म्हणाले. सत्तेत अधिकाराचा समसमान वाटप आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात जे ठरलेल आहे त्यानुसार पुढच्या सर्व गोष्टी घडतील असे संजय राऊत यांनी सांगितलं.