स्टेट स्पॉन्सरर्ड दंगल महाराष्ट्रात घडवून आणल्या जात आहेत का – आमदार जयंत पाटील

 

नागपूर – राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडत आहेत. औरंगाबादमध्ये आणि भीमा कोरेगाव येथे दंगल घडली. औरंगाबादमध्ये अफवा पसरवण्यात आल्या. गाडया फोडल्या गेल्या, आर्थिक नुकसान करण्यात आले. पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. जे लोक दंगल करत होते त्यांच्यासोबत काही व्हिडीओमध्ये पोलिस दिसले. या दंगलीमध्ये सहभागी होण्याचे हायकमांडकडून काय आदेश होते का हे या सभागृहात स्पष्ट व्हायला हवे. पोलिसांना दंगल नियंत्रित करण्याचे आदेश होते की दंगल भडकवण्याचे हे स्पष्ट व्हायला हवे अशी मागणी करतानाच स्टेट स्पॉन्सरर्ड दंगल आता महाराष्ट्रात घडवून आणल्या जात आहे की काय अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होवू लागल्याची भीती आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

नियम २९३ प्रस्तावावर आमदार जयंत पाटील बोलत होते. त्यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर टिका केलीच शिवाय गंभीर स्वरुपाचे आरोपही सरकारवर केले. शिवाय भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या शैलीमध्ये चिमटेही काढले.राईनपाडा येथे संतप्त जमावाने निर्दोषांची हत्या केली असे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सरकार करत आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करतील याचे उत्तर मिळायला हवे. जो लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतात किंवा सोशल मीडियावर व्यक्त होतात त्यांना पोलिसांमार्फत नोटीस बजावली जात आहे. देशभरात दलित, अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत आहे. सत्ताधारी दोन समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे दलित समाज आणि अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते, वकील अशा लोकांना पुण्यातून अटक करण्यात आली. आंबेडकर चळवळीतील लोक, मार्क्सवादी लोक, कम्युनिस्ट पक्षाचे लोक सर्वच लोक या सरकारवर नाराज आहे हे आपण मान्य केलेच पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

हे सरकार वेगवेगळ्या आघाडयावर अपयशी ठरले आहे. यांनी विविध घोषणा केल्या मात्र त्यात हे अपयशी ठरले हे मांडण्यासाठी आम्ही २९३चा प्रस्ताव मांडत आहोत असे स्पष्ट केले.राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र गृहमंत्री नेमायला हवा. मुख्यमंत्र्यांना कदाचित मंत्रिमंडळावर वचक ठेवायचा असेल म्हणून त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री ठेवला नाही आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना कुणावर जबाबदारी टाकायचीच नाही असे वाटते असा टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. त्यांच्याकडे कामाचा व्याप मोठा आहे. म्हणून गृहखात्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही. भीमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार पुजा सकट हिचा मृतदेह विहिरीत आढळला. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. पुजा सकट हिची हत्या करण्यात आली आहे का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

नागपूर हे क्राईम कॅपिटल बनले आहे. नागपुरात काही दिवसात २० हत्या झाल्यात. मुख्यमंत्री acceptence mode मध्ये कधीच नसतात. मुख्यमंत्री नेहमी denying mode मध्ये असतात. त्यामुळे गँग्स ऑफ वासेपूर जसा सिनेमा आहे तसा आता नागपूरवर गँग्स ऑफ नागपूर असा चित्रपट बनवावा लागेल आणि त्यामध्ये जळगावचे मंत्री ( गिरीश महाजन ) त्यात हिरोची भूमिका करतील असा मिश्किल टोलाही मुख्यमंत्री आणि महाजन यांना लगावला.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करून मारेकरी ( परशुराम वाघमारे ) महाराष्ट्रात लपला. हत्या करुन महाराष्ट्रात लपण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रात लागू होत आहे की काय अशी शंका आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. गौरी लंकेश यांचे हत्यारे सापडतात मात्र सरकारला दाभोलकर, पानसरे यांचे हत्यारे सापडू शकत नाहीत ही बाब लाजिरवाणी आहे अशी टिकाही आमदार जयंत पाटील यांनी केली.

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी अशी मागणी काही महिला करत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री झाल्यावर ही दारूबंदी करणार आहेत का ? असा सवाल करत सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नेवून बसवले.

राज्याची परिस्थिती फार बिकट आहे. महाराष्ट्रात गुन्हे वाढत आहे. शुक्रवारच्या आत विश्वास पाटील यांची ३३ प्रकरण पटलावर ठेवावीत अन्यथा आम्ही हक्कभंग आणू असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

जगात सर्वात जास्त महाग पेट्रोल डिझेल आपल्या देशात आणि देशात महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल डिझेल आहे. सरकार भरमसाठ कर आकारत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करामुळेच सरकार जगत आहे की काय अशी शंका आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

कांद्याचा दर वाढल्यानंतर अनेकांचे सरकार गेले आहे. लोक मतपेटीतून आपली नाराजी व्यक्त करत असतात. देशात आणि राज्यात एवढी महागाई वाढली आहे की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचे नाव गेले पाहिजे असा जबरदस्त टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल…

Aurangabad Violence- औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली –जयंत पाटील

 

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...