राज्यात नव्या समिकरणाची नांदी ; मेटे-आंबेडकर यांच्यातील गुफ्तगुने चर्चांना उधाण

टीम महाराष्ट्र देशा : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे, तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे सत्तेत असूनही सत्तेच्या पदापासून वंचित आहेत. योगायोगाने शनिवारी (12 जानेवारी) या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि त्यांच्यात 25 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्या चर्चेचा संवाद समजला नसला, तरी विनायक मेटेंची नाराजी उघड आहे. या दोघांमधील गुप्तगूची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे काही नवीन समीकरणे उदयाला येणार का, असे संकेत मात्र यातून दिसत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शनिवारी बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन निर्धार मेळावा झाला. त्यासाठी आंबेडकर शुक्रवारी रात्रीच बीडमध्ये आले होते. नियमित दौऱ्यानिमित्त योगायोगाने आमदार विनायक मेटेही बीडमध्ये होते. शासकीय विश्रामगृहावर थांबलेल्या आंबेडकर यांना भेटण्यासाठी सकाळी साडेदहाच्या दरम्यान विनायक मेटे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहावर पोचला. सुरुवातीला मेटेंनी पुष्प गुच्छ देऊन आंबेडकरांचे स्वागत केले. काय, कसे अशी विचारपूस झाल्यानंतर दोघे विश्रामगृहाच्या खोलीत गेले आणि त्या दोघांनी तब्बल 25 मिनीटे बंद दाराआड संवाद साधला.

You might also like
Comments
Loading...