शिवतारेंच्या तत्परतेमुळे बाळाचे वाचले प्राण

vijay shivtare

टीम महाराष्ट्र देशा- नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्य सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे . सर्व मंत्री महोदय व्यस्त असल्यामुळे बऱ्याच जणांचा संपर्क होऊ शकत नाही मात्र जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या तत्परतेमुळे एका बाळाचे प्राण वाचल्यामुळे शिवतारे यांचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पिंपळे येथील मोनाली ताम्हाणे यांना सासवड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते. मात्र, बाळाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने ते उदरात गुदमरत असल्याचे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना सांगितले.त्यामुळे सर्वजण काळजीत पडले. यावेळी महिलेच्या सासूने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना फोन लावला. शिवतारे यांनी त्वरित वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिंदे आणि उर्मिला शिंदे यांना संपर्क करीत आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आणि ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा कामाला लागली. काही वेळानंतर प्रसूती कक्षातून बाहेर येऊन डॉक्टरांनी प्रसूती सुखरूप झाली असून बाळ सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.