पाच हजार ढोल-ताशा वादकांचा राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञ

पुणे : गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ढोल-ताशा पथकांतील वादकांच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये ढोल ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा निर्धार वादकांनी केला आहे.
हा रक्तदानाचा महायज्ञ रविवारी ६ ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत करण्यात येणार आहे. शिबीरातील रक्तदात्यांची यादी सैन्य रुग्णालयाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे जवानांकरीता गरजेच्या वेळी ही तरुणाई रक्तदान करुन देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याकरीता तत्पर राहणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महासंघाचे संजय सातपुते, आशुतोष देशपांडे, केतन देशपांडे, प्रकाश राऊत, अतुल बेहेरे, विलास शिगवण, अ‍ॅड. शिरीष थिटे, अमोल उंदरे आदी उपस्थित होते. पुण्यातील १५० ढोलताशा पथकांसह वर्धा, नागपूर, ठाणे, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ३५ पथके या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प वादकांनी केला आहे.
पराग ठाकूर म्हणाले, कोथरुड, हडपसर, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, मध्य पुणे, येरवडा, पिंपरी-चिंचवड या विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान महायज्ञ सोहळ्याचा मुख्य उद्घाटन कार्यक्रम स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक वेळा रक्तदान करुन रक्तदानाविषयी प्रसार करणाऱ्या राम बांगड, दीपक उपाध्ये, सदाशिव कुंदेन, दत्तात्रय मेहेंदळे, भारती शहा, मुक्ता पुरंदरे, रवींद्र ओक, संतोष ताम्हणकर, शांतीलाल सुरतवाला आदींचा स्मृतीचिन्ह, रोप देऊन यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.