संसर्ग टाळण्यासाठी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची व्यवस्था शाळेत करणार

Rajesh-Tope-1

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. करोनाबाधित रुग्णांची मुंबईत होत असलेली वाढ ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

”मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या लोकांची राहण्याची व्यवस्था शाळांमध्ये केली जाणार आहे. संसर्ग टाळावा यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयं दर तासाला धुतली जाणार असून निर्जंतुकीकरणही केलं जाईल. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1135 वर पोहोचला आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर पोहोचली आहे. ”

तसेच धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊन काटेकोरपणे राबवण्यासाठी एसआरपीएफची मदत घेणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने लोकांवर नजर ठेवली जाईल. याशिवाय झोपडपट्टीभागात निर्जंतुकीरणदेखील केलं जाणार आहे. या लोकांची भोजनाची व्यवस्था कम्युनिटी किचनच्या माध्यमातून केली जाणार आहे’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

त्याचबरोबर मुंबई महापालिकेने एक लाख किट्स रॅपीड टेस्टसाठी मागितले आहेत. केंद्राकडून ते लवकरच प्राप्त होतील. सर्वात आधी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपीड टेस्ट केली जाईल”, असं आरोग्य मंत्री म्हणाले. याशिवाय मुंबईत काही ठिकानी डीसइन्फेकटंट टनलदेखील उभारले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.