तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने मोफत वीज द्यावी : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राशेजारी असलेल्या तेलंगण या छोट्या राज्यानेही त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. तसेच मोफत वीजही दिली. महाराष्ट्रात फक्त कर्जमाफीची घोषणा झाली. अंमलबजावणीच्या नावाने सगळी बोंब आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच लवकरात लवकर सरकारने सरकसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील सरकारने मोफत वीज द्यावी अशी मागणी देखील त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. याच यात्रेच्या पूर्वतयारीसाठी धनंजय मुंडे नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र अंमलबजावणी कधी केली जाणार? असाही प्रश्न त्यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.