राज्य सरकार पंतजली वर मेहरबान का ?

'आपले सरकार' सेवा केंद्रामार्फत करणार विक्री

मुंबई : राज्य सरकारने योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात विकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश यामध्ये आता रामदेव बाबांच्या पतंजलीला खास स्थान देण्यात आले असून सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजलीवर मेहेरनजर दाखवत असल्याचा आरोप करत एकाच खासगी कंपनीवर सरकारला इतके प्रेम का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने ग्रामीण व शहरी भागात ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्राम पंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिकांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. सरकारने या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनेही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकामध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर एकाही खासगी उत्पादकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारची पतंजलीवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारच्या या निर्णयाला अनेक उद्योजकांनी विरोध दर्शवला आहे. यावरच मुंडे यांनीही आक्षेप नोंदवला.

You might also like
Comments
Loading...