राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत; जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता प्रकल्प समजल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका

टीम महाराष्ट्र देशा: जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक, निधी अभावी कामं थांबली आहेत. राज्यसरकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता प्रकल्प समजल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. भाषणातून नेहमी जलयुक्त शिवारच्या कामांचा उदो उदो करणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

३१ जानेवारीला विभागाच्या सचिवांना राज्यातल्या जलयुक्त शिवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्या बैठकीमध्ये ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे परंतु काम सुरू झालेली नाहीत अशी सर्व कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत. तसेच विभागाकडे सध्या निधी नसल्यामुळे इथून पुढे लघु पाटबंधारे विभागाकडून नवीन कामे घेऊ नयेत असेही आदेश देण्यात आलेत. सचिवांनी जिल्हा कार्यालयांना पाठवलेलं पत्र आणि जिल्हा कार्यालयाने संबंधित कंत्राटदारांना पाठवलेले पत्र दोन्ही पत्रं असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी टंचाई सदृश्य जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. मात्र सध्या मराठवाडा आणि विदर्भात पाणीटंचाई असून जलयुक्त शिवारच्या कामांना ब्रेक दिल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.