fbpx

तावडेंच्या शिक्षण मंत्रालयाचा अजून एक तुघलकी फतवा

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे त्यांचे निर्णय आणि वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. आता तावडेंच्या मंत्रालयाच्या असाच एक निर्णय चांगलाच वादात सापडण्याचे चिन्ह आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना एकप्रकारे शिक्षण मंत्रालयाने जबरदस्तीच केल्याचे दिसून येते आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहावी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भास संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हेतू योग्य असला, तरी राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने ज्याप्रकारे फतवा काढला आहे, त्यावरुन अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने आदेशात काय म्हटलंय ?

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आदेश काढला आहे. यातील सूचना वाचल्यावर धक्का बसतो. सहावीच्या इयत्तेपुढील सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठी आवश्यक सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात. कार्यक्रमाच्या दिवशी लाईट जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या दुर्गम ठिकाणी टीव्ही सिग्नल नाही, अशा ठिकाणी रेडिओ किंवा एफएमवरुन कार्यक्रम ऐकवावा, असे आदेश आहेत.

कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकवला, म्हणजे सर्व संपले असेही नाही. शिक्षण मंत्रालयाने पुढेही आदेश दिलेत. कार्यक्रम दुपारी एक वाजता संपल्यानंतर 2 वाजता कार्यक्रमाचा अहवाल सादर करावा. तो अहवाल 3 वाजेपर्यंत पंतप्रधान कार्यालयाला देण्यात येणार आहे. अहवालात कार्यक्रम बघतानाचे मुलांचे 5 फोटो आणि 3 मिनिटांचा व्हिडीओ असायला हवा, असे आदेशच आहेत.