उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरवात, कॉपीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष पथक

राज्यभरात २५२ भरारी पथकांची नियुक्ती

पुणे : उद्यापासून बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला सुरवात होत आहे. राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात २ हजार ८२२ परीक्षा केंद्र आहेत. पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तसेच कॉपीचे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यभरात २५२ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ भरारी पथकं राखीव ठेवण्यात आली आहे.

यावर्षी भरारी पथकांची संख्या २५२ करण्यात आली आहे. शिवाय उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांमध्ये बदल होऊ नयेत. यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर पहिल्यांदाच बारकोडची छपाई केली जाणार आहे. बारावीच्या परीक्षार्थींमध्ये ८ लाख ३४ हजार १३४ विदयार्थी, तर ६ लाख ५० हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८० हजार ८२०, कला शाखेचे ४ लाख ७९ हजार ८६६ आणि वाणिज्य शाखेचे ३ लाख ६६ हजार ७५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजेपर्यंत येणे अनिवार्य करण्यात आले आहे.