आतातरी शाळा सुरु करा, विद्यार्थी पालक हवालदिल!

school

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्यात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आता कमी झालेली रुग्ण संख्या पाहता शासनाने शाळा सुरू करून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह, विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून करण्यात आली आहे.  ग्रामीण भागातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्याप्रमाणेच शहरातही रुग्ण संख्या कमी आहे.

ग्रामीण भागातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू झालेल्या आहेत. शहरातही शासनाकडून शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या परंतु, अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या दीड वर्षापासून नर्सरी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असल्याचा परिणाम लहान मुलांवर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विद्यार्थी घरी राहून आळशी झाले आहेत, तर त्यांच्यातील चिडचिडेपणासुद्धा वाढला आहे.

बाहेर जाणे बंद असल्याने, अनेक मुले लठ्ठ झाली आहेत. शाळा बंद असल्याने दिवसभर लहान मुलांचे काय करावे, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. बाजारपेठा सण, उत्सवांना परवानगी दिली जाते मग शिस्तीत चालणार्‍या शाळांना मात्र कोरोनाची भीती दर्शविली जात असल्याचा सूर उमटत आहे. शाळा सुरू न झाल्याने मुलांचे बौद्धिक नुकसान होत असल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी शासनास पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या